तुळसबाई पंढरी केंद्रे (PSI)
४ जुलै २०२३,दुपारी तीन-सव्वातीनची वेळ असेल. तुळसचा मोबाईल वाजला. पलीकडून मोठा भाऊ बोलत होता. “तुळस PSI चा रिझल्ट लागला. तू PSI झालीस. तुझ्या सगळ्या कष्टाचं, संघर्षाचं चीज झालं. आम्हाला सगळ्यांना तुझा खूप अभिमान आहे…” तुळसचे डोळे भरून आले, आपले स्वप्न पूर्ण झाले. तिच्या तोंडून शब्द फुटेना.
हा सगळा संवाद आहे तब्बल सात वर्ष स्पर्धा परीक्षा क्षेत्रात झगडणार्या तुळसबाई पंढरी केंद्रे हिचा. लातूर मधल्या कुणखे या दुष्काळग्रस्त भागातील सामान्य शेतकरी कुटुंबात तुळसचा जन्म झाला. प्राथमिक शिक्षण गावातील जिल्हा परिषद शाळेतून आणि बारावीपर्यंतचे शिक्षण लातूरमध्ये पूर्ण केल्यावर तुळसने आई-वडिलांच्या इच्छेखातर डी. टी.एड पूर्ण केले आणि कार्यक्षेत्र म्हणून शिक्षण क्षेत्राची निवड केली. पण तुळसला काही वेगळंच करायचं होतं. शिक्षण क्षेत्रात आपण रमणार नाही हे तिला माहित होतं. मग मोठ्या भावासोबत तुळस स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करू लागली. सन 2017 मध्ये पीएसआय बनण्याचे ध्येय उराशी बाळगून तुळसचा खडतर प्रवास सुरू झाला. 2017 मध्ये तिने पहिल्यांदा संयुक्त पूर्व परीक्षा दिली आणि फक्त 16 गुण मिळून ती अपयशी झाली. खरंतर अगदी पहिल्या प्रयत्नात हे दारूण अपयश पचवून पुन्हा अभ्यासाला लागणं सोपं नव्हतं. बरेच विद्यार्थी अशावेळी मागे फिरतात, पण तुळसने ठरवलंच होतं पीएसआय व्हायचं. स्वतःच प्रेरणा घेऊन झपाटून अभ्यास केला, 2018 च्या पूर्व परीक्षेमध्ये मेरीट एवढे गुण मिळवून उत्तीर्ण झाली. दृढ निश्चयाने मुख्य परीक्षेचा अभ्यास करून परीक्षा दिली. इथेही तिला अपयशाने गाठलं. फक्त दोन गुण कमी पडले आणि तुळसचा बांध फुटला. पण माघार घेईल ती तुळस कुठली. परत तेच दैनंदिन चक्र सुरू झाले. रूम आणि अभ्यास या वेळापत्रकात आता तिने स्वतःवर काम करायचे ठरवले. आपण कुठे कमी पडलो? काय चुका झाल्या? याचे विश्लेषण करून अभ्यासात बदल केले आणि 2019 ची पूर्व परीक्षा उत्तीर्ण झाली.मुख्य परीक्षेचा छान अभ्यास करून पहिल्या पेपरसाठी परीक्षा केंद्रावर पोहोचली. दुर्दैवाने परीक्षा केंद्रातील भयंकर स्पर्धा पाहून भावनिक दडपण आले आणि तुळस चक्कर येऊन पडली. पुन्हा अपयशाने गाठले….
या घटनेनंतर सातच दिवसांनी 2020 ची पूर्व परीक्षा होती. हे महादिव्य पार करायचे असा तुळसने चंग बांधला. पीएसआय होण्यासाठी जे जे गुण आवश्यक आहेत ते सर्व आत्मसात करायचा निर्धार तिने केला. दरम्यान कोणालाही न टाळता येणारा covid चा प्रादुर्भाव सुरू झाला आणि ही परीक्षा ऐतिहासिक म्हणजे तब्बल साडेतीन वर्षे चालण्यास कारणीभूत ठरला. 2021च्या सप्टेंबर मध्ये पूर्व परीक्षा सप्टेंबर 2022 मध्ये मुख्य परीक्षा आणि 2023 मध्ये ग्राउंड, मुलाखत अशा भल्या मोठ्या कालावधीनंतर अंतिम निकाल लागला.
या संपूर्ण प्रवासात तुळसच्या कुटुंबाने दिलेला पाठिंबा महत्त्वाचा होता. मुलगी म्हणून कधी कुठल्या मैदानी खेळात भाग घेऊ नये, मुलीचा हात पाय मोडला तर कसं होईल ही मानसिकता असलेले आई-वडील नंतर तिच्या शारीरिक चाचणीच्या तयारी मध्ये खंबीरपणे तुळससोबत उभे राहिले.अजिबातच सराव नसल्यामुळे तुळसला ग्राउंडची प्रॅक्टिस करताना पायाला खूप दुखापती झाल्या. पळताना ती इतक्या वेळा पडली की ही मुलगी शारीरिक चाचणीमध्ये गुण मिळवेल असं कोणालाच वाटेना. तुळसला मात्र आत्मविश्वास होता. पाय मोडला तरी चालेल पण मी पळणार आणि पोस्ट मिळवणार. तुळसचा हा आत्मविश्वास सार्थ होता.
एकलकोंडी,अबोल, कोणाशी स्वतः चर्चा न करणाऱ्या तुळसने आपल्या उणिवांवर देखील मात केली. संवाद कौशल्य वाढवले. अनेक वेळा आरशासमोर बोलण्याचा सराव केला. स्पार्क अकॅडमीच्या अभिरूप मुलाखतीचा लाभ घेतला आणि मुलाखतीसाठी सज्ज झाली.
दुर्दैव एखाद्याची पाठ सोडत नाही म्हणतात ते खरंय… मुलाखतीच्या दिवशी सकाळी सात वाजता मुलाखत केंद्रावर रिपोर्टिंग झाले. पण तुळसची मुलाखत होईना. नाश्ता नाही, जेवण नाही अशा अवस्थेत मानसिकता संयमित ठेवणं कठीण होतं. दुपारी चार सव्वाचार वाजता मुलाखत झाली. तुळसने अतिशय सकारात्मकतेने ही मुलाखत दिली आणि PSI पदावर शिक्कामोर्तब केले.
दुष्काळग्रस्त खेड्यातील एक अबोल मुलगी जिद्द, आत्मविश्वास, संयम, सातत्य आणि चिकाटी या गुणांच्या जोरावर पोलीस उपनिरीक्षक पदावर विराजमान झाली. या प्रवासातच तुळसने राज्यशास्त्र विषयात पदवी मिळवली आणि तिच्या कुटुंबातील पहिली पदवीधर मुलगी ठरली.एका मुलीने निश्चय केला आणि कुटुंबाची साथ मिळाली तर मुलगी किती पुढे जाऊ शकते याचा आदर्श तुळसने घालून दिला.
स्पार्क अकॅडमी