Back

सागर मुळीक ,उपजिल्हाधिकारी

कोणत्याही अपयशाला सामोरे जाणे व जिद्दीने पुन्हा उभे राहणे याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे इंदापूर तालुक्यातील कचरेवाडी या छोट्याशा खेड्यातील सागर धनाजी मुळीक.

            सागरचे प्राथमिक शिक्षण जि.प.प्राथमिक शाळा, कचरेवाडी येथे झाले व त्याचे माध्यमिक शिक्षण अनंतराव पवार माध्यमिक विद्यालय, निमगाव येथून पुर्ण झाले. एस. बी. पाटील कॉलेज ऑफ इंजिनियरिंग,इंदापूर येथून मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी मिळवली. त्यानंतर त्याने भोसरी एम. आय. डी. सी मधील कंपन्यांमध्ये काही काळ काम केले. परंतु या कामात तो समाधानी नव्हता. लहानपणापासूनच काहीतरी वेगळे करण्याची इच्छा होती, त्यातूनच तो  व्यवसाय क्षेत्राकडे वळला. सुरुवातीला मित्रासोबत भागीदारीतून बॅक बेझर नावाच्या प्रोडक्टचा व्यवसाय सुरु केला. पण त्यात अपयश आले व त्याच्यासमोर  कर्जाचा मोठा डोंगर उभा राहिला. परंतु यातून आलेल्या अपयशाला न जुमानता तो दुसऱ्या व्यवसायाकडे वळला. त्याने  आळंदी  येथे कार वाँशिगचा व्यवसाय तसेच ऑनलाइन कार सर्व्हिसेस इत्यादी व्यवसाय सुरु केले, पण त्यातही  फारसे  यश मिळाले नाही. व्यवसायात सतत येणारे अपयश व वाढत जाणारे कर्ज यातून सागरने सत्य  स्वीकारले की, आपण व्यवसाय करण्यासाठी आता तयार नाही किंवा हे क्षेत्र आपल्यासाठी योग्य नाही.

             काहीतरी समाजहिताचे काम करण्याची जिद्द असलेल्या सागरच्या जीवनात असा प्रसंग घडला  की ज्यामुळे त्याच्या आयुष्याला कलाटणी मिळाली व तो स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्राकडे वळाला . एकदा दुचाकीवरून जात असताना एका कारला धडक लागली . पण ती कार एका गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीची असल्याने त्याने सागरशी  अरेरावी केली व मारहाण करण्याचा प्रयत्न केला. या प्रसंगामुळे सागरच्या मनावर मोठा परिणाम झाला. त्याला  सामान्य नागरिकांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराची जाणीव झाली व समाजासाठी विधायक काम  करण्याच्या हेतूने  स्पर्धा परीक्षेच्या क्षेत्राकडे वाटचाल सुरु केली.

            भूतकाळात आलेल्या अपयशाला न जुमानता सागरने २०१९ सालापासून स्वतःला पूर्णपणे अभ्यासात झोकून दिले. २०२० सालचे विक्रीकर निरीक्षक हे पद अवघ्या ०.५० गुणांनी हुकले. हाता तोंडाशी आलेला घास दूर गेल्याने ते खूप दुःखी होते. अनेकदा ते भाऊकही झाले पण या कठीण काळात त्यांचे कुटुंबीय आणि मित्र त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. सागरने पुन्हा जिद्दीने अभ्यास सुरु केला. अभ्यासात सातत्य व स्वतःवरील आत्मविश्वासामुळे २०२१ नंतरच्या प्रत्येक मुख्य परीक्षेसाठी तो पात्र ठरत गेला. अखेर राज्यसेवा २०२१ च्या मुलाखतीसाठी तो पात्र ठरला. राज्यात ८९ वा क्रमांक मिळवून  त्याची मुख्याधिकारी पदी निवड झाली.

सागरचा प्रवास इथेच थांबला नाही.२०२१ च्या परीक्षेत post नक्की मिळणार हे माहीत असूनही सागरने पुढची mpsc परीक्षा देण्यासाठी अधिक कसून तयारी केली. २०२२ राज्यसेवेतून लेखी परीक्षा आणि मुलाखतीमध्ये उत्तम गुण मिळवून  उपजिल्हाधिकारी बनला. या संपूर्ण प्रवासात सागरची आई त्याचे सर्वात मोठे प्रेरणास्थान होती. आज आई- वडिलांच्या कष्टाचे सार्थक करणारा सागर मुळीक अनेक तरुणांसाठी आदर्श व मार्गदर्शक बनला  आहे.

स्पार्क अकॅडमी