अमृता बाठे – पोलीस उपनिरीक्षक
पुरंदरच्या पायथ्याशी वसलेलं कुंभोशी गाव! चारही बाजूने डोंगर असलेल्या छोट्याशा खेड्यात जिल्हा
परिषद शाळेतून अमृता इयत्ता चौथी पास झाली. आता पाचवीचे शिक्षण घ्यायला पायी डोंगर ओलांडून
एक दीड किलोमीटर चालून केतकावळेला शाळेत जावं लागणार होतं.अमृताच्या वडिलांना आपल्या
मुलीमध्ये स्पार्क जाणवला होता म्हणूनच त्यांनी इयत्ता पाचवीसाठी तिला महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेत
पाठवले. इथूनच अमृता बाठेची वेगळी जडणघडण सुरू झाली. महिला आश्रममध्ये बारावी कॉमर्स पूर्ण
करून तिने पुढे सिद्धिविनायक महाविद्यालयात बीबीएच्या अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला. या
अभ्यासक्रमाची फी भरण्यासाठी तिथेच कमवा शिका योजनेत काम सुरू केलं. बीबीएची पदवी पूर्ण
केली. पण पुढे एमबीए करण्याइतकी आर्थिक परिस्थिती नव्हती. खेळात रमणारी कबड्डीपटू अमृता
राज्यस्तरापर्यंत खेळली होती,अनेक मॅरेथॉन मध्ये बक्षिसे मिळवली होती पण नॅशनलपर्यंत पोहोचू न
शकल्याची सल सतत तिच्या मनात होती. म्हणूनच जिद्द पणाला लावणारे स्पर्धा परीक्षांचे क्षेत्र तिने
निवडले.
पीएसआय किंवा डीवायएसपी बनण्याचे ध्येय उराशी बाळगून 2019 मध्ये अमृताने पहिली पूर्व परीक्षा
दिली आणि फक्त दोन गुणांनी ती मुख्य परीक्षेसाठी अपात्र ठरली.
हे अपयश आणि पुण्यातील प्रचंड स्पर्धात्मक, भीतीदायक वातावरण या सगळ्यावर मात करत,लक्ष
विचलित करणाऱ्या गोष्टींपासून लांब राहिली. स्वतःची वेगळी अभ्यास शैली तयार केली. पहाटे पाच
वाजता उठून जवळच्या बागेत व्यायाम आणि घरात मदतही सुरू होती. महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण झाले
तसे अमृता तिच्या मावशीकडे राहू लागली. पुण्यात कसबा पेठेत दहा बाय दहाच्या खोलीत मावशीचे
कुटुंब राहत होतं पण अमृता त्यांच्यात सामावून गेली. मावशीनेही तिला प्रत्येक गोष्टीसाठी प्रोत्साहन आणि
पाठिंबा दिला. जिथे जागा मिळेल जिथे वेळ मिळेल तसा अमृता अभ्यास करत होती. कधी घराबाहेरच्या
छोट्या पॅसेजमध्ये, कधी बस स्टॉपवर, कधी बसमध्ये, स्वतःचे व्हॉइस रेकॉर्डिंग ऐकणे ,कधी हातावर
महत्त्वाच्या नोंदी लिहून,मुद्दे वाचणे असा अभ्यासाचा ध्यास घेतला.
एका क्लासमध्ये पार्ट टाइम जॉब करत अभ्यास सुरू होता. “2020 ची परीक्षा पास व्हायचीच कारण
आपल्याकडून सर्वांना खूप अपेक्षा आहेत”, असे मानसिक दडपण होतेच. त्यात कोविड ची भर पडली. पण
अमृता डगमगली नाही. छोट्या छोट्या गोष्टीत तिचे नियोजन होते आणि त्याची अंमलबजावणी देखील
करत होती. लॉकडाऊनच्या काळात अमृता आजोळी पोहोचली जवळपास अभ्यास करणारं कोणी नाही,
अभ्यासिका नाही अशा परिस्थितीत समाज माध्यमांचा सकारात्मक प्रभावी वापर सुरू केला. एका
टेलिग्राम ग्रुपची सदस्य होऊन वेगवेगळ्या विषयांचे प्रश्न तयार करणे, छोट्या छोट्या घटकांवर नोटस्
तयार करणे अशाप्रकारे अभ्यासात सातत्य ठेवले.
ग्राउंडची तयारी करण्यासाठी गावात मैदान नव्हते मग शेतातच पळण्याचा सराव केला. स्वतः खेळाडू
असल्याने व्यायाम, आहार, सराव इत्यादींचे वेळापत्रक करून प्रत्यक्षात आणले त्यासाठी गावातील एका
निवृत्त सेना अधिकाऱ्याचे मार्गदर्शन घेतले आणि शारीरिक चाचणीमध्ये शंभर पैकी ९३ गुण मिळवले.
नियोजन,मेहनत, संयम आणि सातत्याच्या जोरावर जिद्दी अमृताने पीएसआय पोस्ट खेचून आणली. केवळ
गावातच नाही तर पंचक्रोशीत पहिली महिला अधिकारी बनली. जिथे अगदी २० व्या वर्षात मुलींचे लग्न
लावून दिले जात होते तिथे अमृताचा आदर्श घेऊन पालक आपल्या मुलींना पुढे शिक्षण देऊ लागले. आपल्या
मुलींना सुद्धा त्यांचे अस्तित्व निर्माण करावे म्हणून पाठिंबा देऊ लागले. स्पर्धा परीक्षा देऊ इच्छिणाऱ्या
मुलींना अमृता स्वतः मार्गदर्शन करत आहे. अशाप्रकारे अमृता एका सामाजिक बदलाची प्रेरणा ठरली आहे.
स्पार्क अकॅडमी,पुणे